जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; उद्या जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम?
मुंबई । सध्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
उद्या ७ जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ३१ जानेवारी २०२६ ची मर्यादा ओलांडली जाणार असल्याचे संकेत आहेत. याचे कारणही आता समाेर आले आहे.


सध्या सुरु असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या भागात महापालिका निवडणुका सुरू आहेत, त्याच ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकाही होऊ घातल्याने एकाच वेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. यामुळे ३१ जानेवारी २०२६ ची मुदत ओलांडली जाणार असल्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्वाची बैठक बोलावली असून, मनुष्यबळाबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची मुभा देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
आयोगाने बोलावलेल्या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका निवडणुकांची मतमोजणी, त्यावेळी निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारीख यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे आज राज्य निवडणूक आयोगाची बैठक पार पडल्यांतर चर्चेअंती कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.