राज्यात मुंबई, ठाणे सह २९ महानगरपालिका निवडणुकांचा मोठ्या प्रमाणावर झंझावाती प्रचार सुरु आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निक्काल लागेल. परंतु डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या असो किंवा आताच्या महानगरपालिका निवडणुका असोत अगदी हल्ली होत असलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा दर्जा अतीशय खालावलेला दिसून येतोय. कोण काय काय भाषणे करतो आणि या भाषणांमधून कमरेखालचे वार करण्यात येतात ते पाहून/ऐकून लाज वाटते. ही कसली लोकशाही? आणि हा असा दळभद्री प्रचार? एक बातमी वाचनात आली. ‘विलासरावांच्या आठवणी लातुरातून पुसून टाकणार !’, हीच ती बातमी.
त्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंहतोड जवाब दिलाय. पण केवळ एवढेच पुरेसे नाही. मुळात भारतीय जनता पार्टी आज जी काही आहे ती अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांनी ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत महाअधिवेशन घेऊन स्थापन केलेली पार्टी आज राहिलेली नाही. पक्ष स्थापनेची तारीख जाणीवपूर्वक दिली आहे कारण भारतीय जनता पक्षात आलेल्या नवहिंदुत्ववाद्यांच्या स्मरणात ही तारीख रहावी. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यातून असंख्य लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले. हे प्रवेश साम दाम दंड भेद या सर्वांचा पुरेपूर वापर करुन देण्यात आलेले आहेत.


मुळात आजचे भारतीय जनता पक्षाचे नेते भारताला २०१४ सालीच स्वातंत्र्य मिळाले अशा भ्रमात वावरत असून पक्षाचे संस्थापक नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांचीच ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. त्याच गोपीनाथ मुंडे यांनी २०१३ च्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदावर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावेळी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष होते. नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत झाले आणि घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांना प्रत्येकी तीन तीन वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. पूर्ती कारखान्याचे नसलेल्या घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढून गडकरी यांना राजीनामा द्यावा लागला आणि राजनाथसिंह हे संकटमोचक राष्ट्रीय अध्यक्ष पदावर स्थानापन्न झाले. महाराष्ट्रात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मुदतवाढ देण्यास गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केला तेंव्हा मुनगंटीवार यांनी मला तुम्ही पदावर ठेवा किंवा ठेवू नका पण मुंडे साहेबांना पक्षाबाहेर जाण्यापासून रोखा, अशी सुस्पष्ट भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली. गोपिनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नांव सुचविले तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. अरे, मुंडे यांनी गडकरी यांच्या समर्थकाचे नांव कसे सुचविले? देवेंद्र फडणवीस हे ना गडकरींचे, ना मुंडेंचे, ते तर रेशीमबागेचे.
लोकसभेच्या निवडणुका झाल्या नंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव होते पण मुंडे यांचे नाव नव्हते. तेंव्हा गोपीनाथरावांनी विधानसभेचे तत्कालीन विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे आणि नूतन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना नवी दिल्ली येथे तातडीने बोलावून घेतले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या समोर केलेल्या जबरदस्त युक्तीवादामुळे देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात पक्के बसले परिणामी नरेंद्रांचा पुरेपूर वरदहस्त देवेंद्रांच्या शिरावर बसला. गडकरी यांच्या बरोबर मुंडेही केंद्रात मंत्री झाले. दुर्दैवाने गोपीनाथरावांचे ३ जून २०१४ रोजी अपघाती निधन झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या देहावसानामुळे सगळी समीकरणे बदलली. देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पक्ष एकवटला. गोपीनाथ मुंडेंची माणसे हळूहळू अडगळीत पडू लागली. योजनेला, रस्त्याला नांव देणे, पुतळा उभारुन त्यांना पुष्पमाला अर्पण करणे या पलिकडे मुंडे आणि त्यांचे समर्थक यांची काय परिस्थिती झाली त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता. पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला, त्या पुढे कशा आल्या हा इतिहास सर्वांसमोर आहे.
संसदीय लोकशाही, संविधान याचे अर्थ आपापल्या परीने लावण्यात येत आहेत. मुळात मराठवाड्यातील गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोन नेत्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट (न मिटणारा) ठसा उमटविला आहे. विलासराव आणि गोपीनाथरावांची दोस्ती जगजाहीर आहे. ‘ही दोस्ती तुटायची नाय ‘ , गाणे बहुधा महेश कोठारे यांनी या दोघांवरच बेतलेले असावे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. १९९५ साली शरद कृपेने विलासरावांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना भाजप युती चा पाठिंबा घेतला होता. अर्ध्या मताने ते पराभूत झाले. तेंव्हा विलासराव देशमुख यांच्या पाठीशी गोपिनाथ मुंडे हे भरभक्कम पणे उभे होते. आणि त्याच १९९५ साली पडद्यामागून विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांनी सूत्रे फिरवली तेंव्हा तब्बल ४५ अपक्ष आमदार शिवशाही सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि १४ मार्च १९९५ रोजी डॉ. मनोहर गजानन जोशी आणि गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले. विधानपरिषद निवडणुकीत उभ्या असलेल्या विलासराव देशमुख यांचे कॉंग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आणि ते पराभूत झाल्यावर पुनश्च कॉंग्रेस पक्षात प्रवेश करते झाले. त्यावेळी मी सामनामध्ये त्यांची प्रतिक्रिया दिली होती की माझ्या रक्तातून कॉंग्रेस कोण काढणार ? हा मथळा आठ स्तंभात सामनामध्ये आला होता. विलासरावांनी हीच आठवण २००५ साली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलून दाखविली होती. १९९९ साली विलासराव देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन घेऊन मुख्यमंत्री पद मिळविले.
त्याच काळात सौ. प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला मराठी राष्ट्रपती झाल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक असतांनाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याबद्दल आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव दगडोजीराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव उर्फ आर आर पाटील यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची मोठ्या मनाने भेट घेतली होती. विलासराव देशमुख यांनी ज्या ज्या खात्याचे मंत्रीपद भूषविले त्या त्या खात्यांचा त्यांनी लातूर जिल्ह्यासाठी उपयोग करुन घेतला. इतकेच नव्हे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे स्वतंत्र झाले आणि सिंधुदुर्गची राजधानी ओरोस की कुडाळ या वादात दहा वर्षे गेली तेंव्हा दहा वर्षांचे दोनशे कोटी रुपये विलासरावांनी लातूर जिल्ह्यात नेले. शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याचे भाग्यविधाते म्हणून संबोधण्यात येते. त्यांचे राजकीय शिष्य विलासराव देशमुख होते.
अशोक चव्हाण हे विलासरावांचे गुरुबंधू. परंतु विलासरावांनी वादग्रस्त विषय टाळून लातूर जिल्ह्याचा विकास घडवून आणला आणि विकास कोणी आपल्याला ताटात वाढून देणार नाही तर तो खेचून आणावा लागतो, असे विलासराव देशमुख यांनी ठणकावून सांगितले होते. वैधानिक विकास मंडळाला व्यक्तीश: विरोध असतांना राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे स्वागत केले. लातूर हे अत्यंत विकसित कसे होईल याकडे त्यांचा कटाक्ष असे. मांजरा सहकारी साखर कारखाना चालवितांना त्यांनी शेतकऱ्यांना सर्वांपेक्षा जास्त भाव मिळवून दिला. विलासराव देशमुख यांचे अमित, धीरज आणि रितेश हे तीन सुपूत्र आज त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत, दोघे जण राजकारणात तर रितेश चित्रपट सृष्टीत नावाजलेले आहेत. आई वैशाली आणि काका दिलीपराव मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे विलासरावांचे नांव पुसण्याचा विचार (राणा भीमदेवी थाटात राजकीय भाषण) करणाऱ्यांना सात जन्म घेऊनही ते जमणे निव्वळ अशक्य आहे. परंतु ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांची आठवण ठेवली नाही त्यांच्याकडून विलासरावांबद्दल काय अपेक्षा ठेवणार ? असो !
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).