…ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी ; योगेश वसंत त्रिवेदी यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई | साप्ताहिक आहुति च्या हीरक महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागात असलेल्या रोटरी सभागृहात प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्री पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे जिल्हा माहिती अधिकारी तसेच माहिती विभागाचे कोकण विभागीय प्रभारी उपसंचालक मनोज सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत दणक्यात साजरा झाला.
या समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी भूषविले. आमदारद्वय श्री. किसन कथोरे, डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ येथील नगराध्यक्ष सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले आणि बदलापूर येथील नगराध्यक्ष सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. अध्यक्षस्थानावरुन योगेश वसंत त्रिवेदी यांनी केलेल्या घणाघाती भाषणात सर्वप्रथम आश्चर्य व्यक्त केले ते समारंभाच्या अध्यक्षस्थानी आपली निवड करण्यात आल्याबद्दल. ते म्हणाले, “गिरीश वसंत त्रिवेदी यांनी आहुति च्या संपादकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अनेक धक्के दिले. आज तर त्यांनी चक्क मलाच धक्का दिला. आहुतिच्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी हे भूषवतील, असे आजच्या निमंत्रण पत्रिकेत नमूद केले. ही पत्रिका टपालाने मला मिळताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी आणि समारंभाचा अध्यक्ष ? इथे आल्यावर याचा उलगडा झाला.


अर्थात दस्तुरखुद्द संपादक गिरीश वसंत त्रिवेदी यांनीच तो केला. १९ फेब्रुवारी १९२१ रोजी नारायण गणेश चंदावरकर हे विधानपरिषदेचे पहिले सभापती झाले तत्पूर्वी तब्बल ७५ वर्षे ही विधानपरिषद ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होती. १९२१ ते २०२१ अशा शंभर वर्षांच्या विधानपरिषद सभागृहातील इतिवृत्तांच्या नोंदीतून विलास मुकादम, किशोर आपटे आणि मी अशा तीनही ज्येष्ठ पत्रकारांनी मुंबई राज्याची पुनर्रचना, अभिनंदन ठराव आणि विधानपरिषदेने संमत केलेली विधेयके, ठराव आणि धोरणे, असे तीन ग्रंथ संपादित केले. शीतल करदेकर , उदय तानपाठक, दिनेश गुणे, संजय जोग यांनी सुद्धा काही ग्रंथांचे संपादन केले.
यापैकी ‘विधानपरिषदेने संमत केलेली विधेयके, ठराव आणि धोरणे’, हा सुमारे ९०० हून अधिक पानांचा ग्रंथ आम्ही संपादित केला, ज्याचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद सभापती प्रा. रामभाऊ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे तसेच विधानमंडळ सचिव २ सौ. मेघना तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात समारंभपूर्वक करण्यात आले आणि संपादक या नात्याने आम्हाला सन्मानित करण्यात आले. यामुळे मला आहुति च्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान देण्यात आले, हा एका परीने अंबरनाथ करांचा गौरव असून ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल.
योगेश त्रिवेदी यांनी आहुतिच्या साठ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतांनाच आपण गिरीश त्रिवेदी यांच्या त्यागावर उभे आहोत, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले. आहुतिने अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पर्यटन केंद्र करणे, अंबरनाथ शहर स्वतंत्र करणे, अंबरनाथ तालुका स्थापन करणे, कल्याण महापालिका आयुक्तांच्या ताब्यात असलेला शिवदर्शन बंगला अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात आणणे, अशा अनेक विषयांवर ठाम भूमिका घेऊन ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. प्रहारचे संपादक श्री पद्मभूषण देशपांडे हे आपले गुरुबंधू असल्याचे सांगून योगेश वसंत त्रिवेदी पुढे म्हणाले की, बाळासाहेब देशपांडे आणि वसंत त्रिवेदी हे सच्चे मित्र. दोघेही राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतले. दोघेही पत्रकार. आज पाचशे रुपयांना किंमत नाही परंतु त्यावेळी आहुति च्या प्रत्येक दीपावली विशेषांकासाठी बाळासाहेब देशपांडे हे किमान पाचशे रुपयांची जाहिरात आवर्जून देत असत. देशपांडे आणि त्रिवेदी यांचे सलोख्याचे संबंध. आणि स्वभावही सारखाच. दोघांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने, निष्पक्षपणे पत्रकारिता केली त्यामुळे आम्हाला तोच वसा, वारसा घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. मनोज सानप यांनी आपल्या नावात आईचा उल्लेख आवर्जून करण्याचा आग्रह धरला, हाच धागा पकडून योगेश वसंत त्रिवेद…