योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन

0

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धेला सुरवात

जळगाव | योग हे भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देण आहे. योगामुळे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले राहते. मन:शांती मिळते. आरोग्यदायी जीवनासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या जीवनात योगाभ्यास केला पाहिजे. राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. योगाच्या विविध प्रकारांचे सादरीकरण करुन आपली प्रतिभा भारतातून आलेले खेळाडू अनुभूती निवासी स्कूलमध्ये दाखवित आहेत, असे अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. तसेच अनुभूती निवासी स्कूलला आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व सीआयएससीई बोर्डचे आभार त्यांनी मानले.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये मुलींची १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय स्पोर्टस समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर, मुख्य पंच डॉ. आरती पाल, एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. अशोक जैन यांनी सीआयएससीई बोर्डच्या स्पर्धेचा ध्वज फडकवला. त्यानंतर अशोक जैन यांनी स्पर्धेची मशाल राष्ट्रीय योग खेळाडू यशश्री नांद्रे हिच्याकडे सुपर्द केली. यशश्रीने प्रदीप सपकाळेकडे तर प्रदीपने ऋद्राक्ष माळीकडे मशाल दिली. शेवटी अन्मय जैन यांच्याकडे मशाल देण्यात आली. त्याच्यासोबत चौघही खेळाडूंनी स्पर्धेची क्रीडाज्योत प्रज्वलित केली. अर्णव शॉ यांनी स्पर्धकांना शपथ दिली.

रिंग जगलिंग, रनपा नृत्याने रंगत…

राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलच्या ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. रिंग जगलिंगने दमदार सुरवात झाली. रिंगच्या साह्याने सादर केलेल्या सामूहिक कसरतींचे प्रेक्षकांनी कौतुक केले. यानंतर ओडिशातील पारंपारिक काठ्यांवरील रनपा नृत्य सादर केले. तोल सांभाळत काठीवर चालत सादर केलेल्या या थरारक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. लाठी-काठी या अनोख्या नृत्यप्रकाराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाचा योग नृत्य खरा कळस ठरला. यशश्री नांद्रे या विद्यार्थिनीने योगासनांचा कलात्मक नृत्याने सादरीकरण केले. शरीर, श्वास आणि साधनेचा अद्वितीय संगम अनुभवत उपस्थितांनी हा क्षण दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासारखा ठरवला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर अशोक जैन यांनी राष्ट्रीय योगासन स्पर्धा खुली झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

अनुभूती निवासी स्कूलमधील वातावरण स्पर्धेसाठी पोषक – रितू पाठक

संपूर्ण भारतातून आलेल्या खेळाडूंना अनुभूती निवासी स्कूल मधील नैसर्गीक वातावरण भावले आहे. योग अभ्याससाठी आलेले खेळाडू शारिरीक व मानसिकदृष्ट्या आनंदी असून योगासना स्पर्धेसाठी येथील वातावरण पोषक असल्याचे रितू पाठक यांनी म्हटले. सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू म्हणाले की, अनुभूती स्कूलने संपूर्ण भारतासाठी योगासन स्पर्धा यशस्वीपणे आयोजीत केली असून येथील व्यवस्था कौतूकास्पद आहे.

देशभरातील १६७ खेळाडूंचा सहभाग

देशभरातून ३३ संघ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी अनुभूती निवासी शाळेत आले आहेत. त्यात १६७ खेळाडू सहभागी झाले आहेत. आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारात योगासनाची विविध आसने सादर केली जाणार आहेत. सेमी फायनल व फायनल नंतर प्रत्येक प्रकारातील विजयी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य देण्यात येणार आहे.

देशभरातील ३३ संघाचा सहभाग

आंध्रप्रदेश, बिहार, सीबीएसई वेल्फअर स्पोर्टस, सीबीएसई, चंदीगड, छत्तीसगड, (सीआयएससीई) कौन्सील बोर्ड, दादर व नगर हवेली, दमण व दीप, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळा क्रीडा संघटना, आयपीएससी स्कूल, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केंद्रीय विद्यालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, नवोदय विद्यालय, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपूरा, उत्तर प्रदेश, विद्याभारती, पश्चिम बंगाल अशा एकूण ३३ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.