चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली ; यावलच्या आमोदाजवळील घटना
यावल । यावल तालुक्यातील आमोदा गावानजीक असलेल्या मोर नदीत खासगी ट्रॅव्हल्स बस कोसळल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, इंदूरवरून भुसावळच्या दिशेने एमपी 09- 9009 या क्रमांकाची लक्झरी बस येत होती. पहाटे सुमारे सहा वाजेच्या सुमारास ही बस आमोदा गावाजवळून वाहणाऱ्या मोर नदीवरील पुलावरून जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही बस थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. यातील जखमींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमींना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. या संदर्भात फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.