गिरणा पाटबंधारे विभागाकडून रब्बी हंगामासाठी मर्यादित पाणी पुरवठ्याचे नियोजन ; ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
जळगाव। गिरणा पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावरील जामदा डावा कालवा, नांदा उजवा कालवा, पारगडाचा कालवा व निम्न गिरणा कालवा, तसेच , अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसेच बोळे, सावरखेडा, शिरसमणी, पिंपळकोठा-भोलाणे, म्हसवा, कंकराज ता- पारोळा निसडी, आडर्डी ता- अमळनेर मन्यारखेडा. विटनेर ता. जळगाव पदमालय खडकेसिम ता एरंडोल हातगाव-१, खडकीसिम, पिंप्री-उंबरहोळ, वाघळा-१, वाघळा-२ देवळी भोरस ब्राम्हणशेवगा, पिंपरखेड, राजदेहरे, कुंझर-2, कृष्णापुरी बोरखेडा, वलठाण, ता. चाळीसगाव, पथराड, ता. भडगाव या मध्यम व लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रांमध्ये रब्बी हंगाम २०२५-२६ करिता मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.
रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये गिरणा प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून, कालवा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑक्टोबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उभी पिके तसेच विहिरीमार्गे किंवा अन्य पर्यायी मार्गाने मर्यादित सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येईल.


या कालावधीत लाभधारक शेतकऱ्यांना गहू, हरभरा, ज्वारी, मका, कडवळ, कपाशी, सूर्यफूल, करडई, भाजीपाला इत्यादी हंगामी पिकांसाठी उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील पाणीसाठ्याचा विचार करून योग्य पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी इच्छुक लाभाधारकांनी पाणी मागणीसाठी नमुना क्रमांक ७/७ अ व ७ ब पाणी अर्ज भरून, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर करावेत, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.