बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’
बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवता आहे याची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार!
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने भारतीय बुद्धिबळ क्रीडा जगतात स्वकर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवली आहे. जॉर्जिया येथे झालेल्या “FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025” स्पर्धेत दिव्या व कोनेरु हम्पी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. टायब्रेक मध्ये दिव्याने रॅपीड फॉरमेंटमध्ये कोनेरु हम्पीचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही महिला भारतीय होत्या हे विशेष!
चीनच्या टॅन झोंगयीला दिव्याने पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक मानांकन असलेल्या प्रतिष्ठित कँडिडेटस स्पर्धेत दोन्ही भारतीय महिलांचे मानाचे स्थान सर्वात्कृष्ट कामगिरीमुळे निश्चित झाले आहे.
दिव्याच्या कारकिर्दीतील हे एक महत्त्वाचं पाऊल ठरले असून दिव्याचे हृदयपूर्वक अभिनंदन! सांगताना आनंद होतो की, जळगावात २०२२ ला नॅशनल टिम चेस चॅम्पीयन स्पर्धेतही दिव्याने सुवर्णपदक त्यावेळी प्राप्त केले होते. दिव्याच्या शिस्तबद्ध खेळण्याची, खेळाप्रती असलेले समर्पणाची जवळून पारख जाणकारांना झाली होती. दिव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घवघवीत सुयश बुद्धिबळ क्षेत्रात विशेष काही करु इच्छिणाऱ्या पुढील पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
अशोक जैन
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार