मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
बीड : विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर 2024) शेवटचा दिवस आहे. त्याआधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. काही जागा त्यांनी रविवारी जाहीर केल्या होत्या. तर काही नावं आज जाहीर होणार होती. पण, “मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही,” असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली.
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार! नेमकं कारण काय?
“आपल्याला निवडणूक लढवायची इच्छा नाही. आम्ही निवडणूक प्रक्रीयेत राहिलो तरी खेळ खल्लास, आणि निवडणुकीतून बाहेर राहिलो तरी खेळ खल्लास… राजकारण आमचा खानदानी धंदा नाही, मी मतदार संघ ठरवले आहेत, फक्त उमेदवारांचे नाव ठरवायचे होते, याला माघार म्हणता येत नाही. हा थोडक्यात गनिमी कावा आहे.
समाज माझ्या लक्षात आला की माझ्या डोळ्यात पाणी यायचं… तुम्हाला ज्याला पडायचं त्याला पाडा, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कोणीही ठेवू नका. कोणत्या ही अपक्षाला, राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याच जागेवर आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाहीये. राजकीय प्रक्रिया वेगळी आहे, जो 400 पार म्हणत होता, त्याने घेतलं फाटून… आंदोलन करताना 1000/ 500 असेल तरी जमतं. पण निवडणुकीत मतदानाची गोळा बेरीज करावी लागते.” असं जरांगे पाटील म्हणाले.