विधानसभेपूर्वी राजकीय भूकंप ; राज्यातील काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार?
मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत असून याच पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकारी आणि आमदारांच्या पक्षांतरांना वेग आला आहे. अशातच शिवसेना शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे.
काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन्ही आमदार लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत. हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत. तर जितेश अंतापूरकर हे नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते.
त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे. या कारवाईपूर्वीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.