जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना खुशखबर ! पुणे-नागपूर(अजनी) वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार
भुसावळ । जळगाव जिह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अजनी (नागपूर) – पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. येत्या रविवार, १० ऑगस्टपासून ही एक्स्प्रेस सुरू होण्याचे संकेत असून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही त्यास दुजोरा दिला. या गाडीला भुसावळ आणि जळगाव येथेही थांबा मिळणार आहे.
मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून करण्यात येत होती. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेक वेळा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
उशिरा का होईना आता वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणी यश आले आहे. लवकरच पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसमुळे पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व आरामदायी होऊ शकणार आहे. ज्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनाही होणार आहे.