जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त
जळगाव : जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने धरणगाव तालुक्यातील बांभोरी, टाकरखेडा, खेडी व आसपासच्या भागात पहाटे व्यापक संयुक्त धाड टाकली. या कारवाईत ३२ ट्रॅक्टर आणि ८ डंपर अशी एकूण ४० वाहने जप्त करण्यात आली असून, ती पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उभी करण्यात आली आहेत.
धरणगाव तालुका परिसरात गिरणा आणि तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानुसार पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम आखली.


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटे पाच वाजता सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा बांभोरी येथे दाखल झाला. यावेळी केलेल्या धडक कारवाईत ४० वाहने जप्त करण्यात आली.
जप्त वाहनांपैकी अनेकांकडे क्रमांक प्लेट नसल्याचे आढळून आले, तर काहींची परवानगी मुदत संपलेली किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर वाहनांची तांत्रिक तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी आरटीओ विभागाची दोन पथके पाचारण करण्यात आली आहेत.पोलिसांनी मात्र अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.