जळगावसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा, बळीराजाची चिंता वाढली

0

मुंबई । महाष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. मार्च महिन्यात तापमान वाढीने कहर केला असून आगामी उन्हाळ्याचे दिवस कसे जाणार याची चिंता नागरिकांना धास्तावत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, या काळात प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि गारपीटसह पावसाची हजेरी लागेल.

विशेषतः १८ ते २० मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडींची तीव्रता वाढणार असून, काही भागांत गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसू शकतो, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

काढणीला आलेला गहू, हरभरा आणि फळबागांना या वादळी पावसाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान बदल या काळात वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात कशी राहणार स्थिती?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १४ ते १६ मार्चदरम्यान उन्हाचा तीव्रपणा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, मात्र उकाडा कायम राहू शकतो. १७ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २१ व २२ मार्चला पावसाचा जोर कमी होऊन ढगाळ वातावरण राहू शकते. २३ मार्चनंतर पुन्हा कोरडे वातावरण निर्माण होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.