ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0

मुंबई | एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांची आज विधानभवनात अचानक भेट झाली. विधानभवनाच्या लिफ्ट जवळ दोन्ही नेते भेटले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लिफ्टमधून प्रवासही केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवनाच्या आवारात भेट झाली. तसेच अनौपचारिक संवादानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जवळीकीची ही नांदी तर नाही ना, अशी विचारणा राजकीय वर्तुळातून होत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली होती. तसेच भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले होते. मात्र पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपानं हे सरकार पाडले होते.

या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत हुकल्याने अनेक समिकरणं बदलली आहेत. तसेच या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता असल्याने भाजपा उद्धव ठाकरेंशी असलेली जुनी कटुता विसरून नव्याने मैत्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दावे केले जात आहेत. तसेच आज झालेल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीमुळे या चर्चांना आणखीनच उधाण आलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.