जळगाव जिल्ह्यात पर्यटन आणि अॅग्रो-इंडस्ट्री वाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विशेष बैठक
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांच्या वाढीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील संधी, अडचणी आणि उपाययोजना तसेच कृषी-उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान हतनूर धरण, गिरणा नदीकाठ, गिरीशिखर आणि इतर निसर्ग पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उभारणे, स्वच्छता, पर्यटकांसाठी माहिती केंद्रे, बोटिंग, नैसर्गिक ट्रेल्स यांसारख्या आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
कृषी उद्योगाच्या अनुषंगाने, शेतमाल प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी (Cold Chain) यंत्रणा, साठवणूक सुविधा आणि स्थानिक उत्पादकांना बाजारपेठांशी जोडणाऱ्या मार्केट लिंकेज प्रणालीवर भर देण्यात आला. निर्यातक्षम मालाचे उत्पादन आणि त्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
या उपक्रमांना चालना देण्यासाठी पर्यटन विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, स्थानिक उद्योजक आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढवण्याचे ठरवण्यात आले. याशिवाय स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून तसेच कृषी उद्योगातील नवउद्योजक म्हणून घडवण्यासाठी प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “जळगावचा समृद्ध निसर्ग व कृषी वारसा हे आपली ताकद आहे. त्याचा योजनाबद्ध उपयोग करून रोजगार, व्यवसाय व अर्थव्यवस्था मजबूत करणे आपले उद्दिष्ट आहे”