भारतीय राजकारणातील हिंदुत्वाचा पहिला खराखुरा चेहरा : डॉ. रमेश प्रभू !

0

सध्याच्या राजकीय वातावरणात हिंदुत्वाचा टेंभा मिरविण्याचे किळसवाणे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. दर्ग्यावर चादरी चढवून आणि ईद मिलनाच्या कार्यक्रमात सीर कुर्मा ओरपणारे हिंदुत्वाचा डांगोरा पिटत असल्याचेही दिसून येते. अशा परिस्थितीत भारतीय राजकारणातील हिंदुत्वाचा खराखुरा चेहरा म्हणून मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश यशवंत प्रभू यांचे नांव प्रकर्षाने घ्यावे लागेल. हा ‘विनोद’ नव्हे तर हीच ‘वस्तुस्थिती’ आहे. डॉ. रमेश प्रभु हे नाव हिंदुत्वाशी संपूर्ण देशात जोडले गेले ते त्यांनी १९८७ साली लढविलेल्या मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोट निवडणुकीमुळे. ही देशातील पहिली निवडणूक थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविण्यात आली होती. लोकप्रतिनिधी कायदा १९५२ अन्वये हिंदुत्वाच्या आधारावर मते मागितल्यामुळे ही निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आणि या निर्णयावर पुढे सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. निवडणूक रद्दबातल ठरली तरी थेट हिंदुत्वाच्या मुद्यावर मते मागता येतात व मतदारांचे ध्रुवीकरण करता येते, हे या निवडणुकीने सिद्ध झाले. या निवडणुकीमुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आला. तर दुसरीकडे याच निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेना नावाचा नवा खंदा राजकीय सहकारी मिळाला. या निवडणुकीने डॉ. रमेश प्रभू यांचे नाव संपूर्ण देशभरात गाजले.

१९८७ साली काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांचे निधन झाले. भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोट निवडणूक लागली. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बडे नेते प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी देण्यात आली. कुंटे यांचे नाव राज्याच्या राजकारणात प्रचंड दबदबा असणारे होते. समाजवादी पार्श्वभूमीच्या कुंटे यांनी मुंबईतील झोपडपट्टीच्या केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईतील झोपडीधारकांना फोटोपास मिळाले होते. काँग्रेस अंतर्गत राजकारणातही कुंटे यांचा मोठा दबदबा होता. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शंकरराव चव्हाण यांच्यासारखे करड्या शिस्तीचे नेते होते. बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील शिवसेना आणि काँग्रेसचे मधूर संबंध संपुष्टात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती. विलेपार्ले येथील या पोट निवडणुकीसाठी त्यांनी मुंबईचे महापौर असलेल्या डॉ. रमेश प्रभू यांची निवड केली आणि निवडणूक घोषणा दिली, ‘गर्व से कहो हम हिंदू है’. आज हिंदुत्वाच्या नावावर देशाची सत्ता काबीज करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल १९८० रोजी जन्म झाला होता. मात्र भाजपने शिवसेनेला १९८७ च्या पोटनिवडणुकीत पाठिंबा दिला नव्हता. तर भाजपचा पाठिंबा जनता पक्षाला होता. जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा, काँग्रेसचे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेचे डॉ‌. रमेश प्रभू अशी ही तिरंगी लढत होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी परळच्या प्रिन्सिपॉल वामनराव महाडिक यांच्या पोट निवडणुकीप्रमाणेच या निवडणूक प्रचाराची व्यूहरचना आखली होती. संपूर्ण मुंबईतील शिवसैनिकांना प्रचारासाठी विलेपार्ल्यात उतरविण्यात आले होते. संपूर्ण विले पार्ले अक्षरशः भगव्या रंगाने न्हाऊन निघाले होते. बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू या दोघांनीही थेट हिंदुत्वाच्या मुद्यावर जाहीर सभांमधून मते मागितली होती. भाजपचा जनता पक्षाला पाठिंबा असला तरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ रमेश प्रभू यांचा झंझावाती प्रचार करीत होते. या सगळ्या झंझावातामुळे प्रभू यांनी निवडणूक जिंकली.

या निवडणुकीमुळे भाजपचे निवडणूक चाणक्य म्हणून ओळखण्यात येणाऱ्या प्रमोद व्यंकटेश महाजन यांना पहिल्यांदाच शिवसेनेचा अंदाज आला व शिवसेना भाजप युतीच्या दिशेने राजकारण सुरू झाले. या पोट निवडणुकीच्या निकालानंतर डॉ. रमेश प्रभू यांच्या विरोधात प्रभाकर कुंटे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये ही याचिका होती. कुंटे यांच्या बाजूने ॲडवोकेट मनुभाई वशी यांनी बाजू मांडली. तर प्रभू यांच्या वतीने प्रख्यात कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर व राम जेठमलानी यांनी बाजू मांडली. पुढे या कायद्यान्वये धर्माच्या नावावर मते मागणे किंवा दुसऱ्या उमेदवाराला मते देऊ नका, असे सांगणे हे अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि न्यायालयाने कुंटे यांची बाजू उचलून धरतांना प्रभू यांची निवडणूक रद्दबातल केली या शिवाय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा धर्माच्या नावावर मते मागितल्याने मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला.
या निवडणुकीमुळे भाजपने शिवसेनेबरोबर युती तर केलीच शिवाय निवडणुकीच्या राजकारणात आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार स्वतःच्या मंचावरून करण्याचे न्यायालयाच्या निकालामुळे त्यांनी कायम टाळले. साध्वी ऋतंभरा किंवा तत्सम आक्रमक हिंदुत्वाची भाषा करणाऱ्यांना प्रचारात हिंदुत्वाचा प्रचार करण्याची जबाबदारी देऊन त्यांना भाजपच्या मंचावर नेण्याचे टाळत मतांचे ध्रुवीकरण करण्याची रणनिती आखण्यात आली.

दुसरीकडे डॉ. रमेश प्रभू यांनाही पुढे सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी आली. शिवसेनेच्या राजकारणातही प्रभू मागे पडत गेले. २००४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडे विलेपार्ले येथून मागितलेली उमेदवारी त्यांना नाकारण्यात आल्यावर प्रभू यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यातून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला. तरीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. कालांतराने डॉ रमेश प्रभू यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांचे फारसे मन रमले नाही. पुढे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील झाले. मात्र राजकारणात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी क्रीडा, सामाजिक कार्य यातच अधिकाधिक वेळ आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात दिला. 🚩मुंबई उपनगराला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व देणगी !🚩 डॉ. रमेश प्रभू यांचा मूलतः पिंड हा सामाजिक सेवेचा. नव्या पिढीला ऐतिहासिक प्रेरणा मिळावी यासाठी डॉ. रमेश प्रभू यांनी जुहू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभे केले आहे. त्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. विलेपार्ले येथे डॉ. रमेश प्रभू यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने भव्य क्रीडा संकुल उभारले.

या संकुलाच्या माध्यमातून सुदृढ, सशक्त खेळाडू तयार व्हावेत आणि आपल्या महाराष्ट्राचे, पर्यायाने हिंदुस्थानचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावेल, असा उद्देश डॉ. रमेश प्रभू यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून या संकुलाची उभारणी केली. या ठिकाणी सर्वात मोठा जलतरण तलाव सुद्धा उभारण्यात आला. आजमितीला हे संकुल डॉ रमेश प्रभू यांचे सुपुत्र अरविंद यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असून त्याचा व्यापही वाढला आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. रमेश प्रभू यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. संयमी, शांत स्वभावाचे डॉ रमेश प्रभू हे भारतीय राजकारणातील संसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल. स्थापनेच्या वेळी राडा संस्कृती म्हणून ओळखण्यात येणाऱ्या शिवसेनेत प्रिन्सिपॉल वामनराव महाडिक यांच्या नंतर मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यांच्या बरोबरीने डॉ. रमेश प्रभूंचे नांव सुसंस्कृत, अभ्यासू नेते म्हणून घ्यावे लागेल. ऐंशीच्या दशकात मुंबई महापालिका निवडणुकीत बशीर पटेल हे मुस्लिम लीगचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे सत्यवान जावकर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर न्यायालयात बशीर पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल करतांना मुस्लिम धर्माच्या नावावर निवडणूक लढविल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. ही याचिका सुनावणीसाठी अद्यापही आलेली नाही. त्यानंतर १९८७ च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेना आणि १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या. डॉ. रमेश प्रभू यांना धर्माच्या नावावर निवडणूक लढविल्याबद्दल दोषी धरण्यात आले तसेच १९९० च्या निवडणूक याचिकांमध्ये डॉ. मनोहर गजानन जोशी यांच्या समवेत अनेक आमदारांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले.

११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी डॉ. मनोहर गजानन जोशी यांना निर्दोष मुक्त करतांना हिंदुत्वाच्या नावावर निवडणूक लढविणे हा निवडणूक भ्रष्टाचार नाही अथवा गैर नाही, असे शिक्कामोर्तब केले. कर्मधर्मसंयोगाने १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या गिरगांव चौपाटीवरील सभेतील “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु. आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे” ही हिंदुत्वाची व्याख्या मुंबई उच्च न्यायालयात न्या. सॅम वरियावा यांच्या न्यायालयात डॉ. मनोहर जोशी यांच्या खटल्यात माझ्या मुखातून पटलावर आली. मनोहर जोशी यांचे वकील जय चिनॉय यांनी शिताफीने ही व्याख्या माझ्या तोंडून काढून घेतली. हीच व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य करीत मनोहर जोशी यांना दोषमुक्त केले. हा इतिहास या अनुषंगाने उद्धृत केला तर ते अनाठायी ठरणार नाही. एकंदरीत डॉ. मनोहर गजानन जोशी हे हिंदुत्वाचा खटला जिंकले तरी भारतीय राजकारणातील हिंदुत्वाचा पहिला खराखुरा चेहरा म्हणून डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या नावाचीच नोंद राजकीय इतिहासात करावी लागेल. डॉ . रमेश प्रभू हे माजी राज्यपाल गणपतराव तपासे यांचे जावई होत. गणपतराव तपासे यांच्या सुकन्या डॉ. पुष्पा याही डॉक्टर होत्या तसेच डॉ रमेश प्रभू यांच्या प्रमाणेच क्रीडा प्रेमी होत्या. प्रभू दांपत्यांनी समाजसेवेचे प्रचंड मोठे जाळे निर्माण केले, ज्याचा उपयोग समाजातील सर्वच वर्गातील होतकरुंनी करुन घेतला. प्रभूंच्या मुलांवरही हेच संस्कार झाले ज्याचा आजही समाजाला यथायोग्य उपयोग होत आहे. आजमितीला डॉ. रमेश प्रभू यांचे चिरंजीव अरविंद आणि सुकन्या लीना हे डॉ रमेश प्रभू यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. डॉ. पुष्पा रमेश प्रभू या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या आत्या असून तपासे आणि प्रभू परिवाराने सामाजिक बांधिलकी मानून कार्य केले आहे, करीत आहेत. डॉ. रमेश प्रभू आणि डॉ. पुष्पा रमेश प्रभू यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! -योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

Leave A Reply

Your email address will not be published.