जळगावमध्ये हुडहुडी वाढली ; जिल्ह्याला थंडीच्या लाटेचा इशारा
जळगाव/मुंबई । उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असून दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. जळगावमधील तापमानात गेल्या दोन दिवसात ४ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मंगळवारी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून यामुळे जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभवता येत आहे. जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
काल म्हणजेच मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड आणि परभणी मधील तापमान ५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जेऊर येथे ६ अंश तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर, पुणे, जळगाव, गोंदिया, नागपूर, भंडारा येथे ९ अंशांपेक्षा कमी, तर मालेगाव, यवतमाळ, नाशिक येथे १० अंशांपेक्षा तापमान नोंदले गेल्याने हुडहुडी वाढली आहे.


किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. मंगळवारी धुळे, निफाड, परभणी, जेऊर, गोंदिया, यवतमाळ येथे थंडीची लाट होती. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड येथे थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.