नागरिकांनो काळजी घ्या ! जळगावला थंडीच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याकडून यलो अलर्ट
जळगाव । बंगालच्या उपसागरातील ‘दिट वाह’ चक्रीवादळ आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे आता पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान तापमानात मोठी घट झाली असून हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. काल धुळे येथे नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड येथे ८.९ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ९.८ अंश, जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा येथे पारा १० अंश व त्यापेक्षा खाली आल्याने गारठा कायम आहे.


या जिल्ह्यांना अलर्ट?
दरम्यान, काल सकाळपर्यंत २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे.