अवकाळीचा ब्रेक, आता उन्हाची एंट्री; जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा जोर वाढणार
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता विश्रांती घेतली असून वातावरण पुन्हा कोरडे होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता असून जळगावकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
वादळी पावसामुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्याचे तापमान ३५ ते ३६ अंशांदरम्यान स्थिर होते. मात्र आता पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात झपाट्याने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील आठवड्यात जळगाव शहराचा पारा ४० अंशांच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार १२ ते १३ एप्रिलनंतर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमान ४२ अंशांपर्यंत जाऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा मार्च महिना तुलनेने कमी उष्णतेचा गेला असला तरी उन्हाळ्याचा खरा जोर आता एप्रिलच्या मध्यापासून वाढण्याची चिन्हे आहेत.