जळगाव जिल्ह्यात आगामी चार दिवस तापमानात वाढ होणार

0

जळगाव । मार्च महिन्याची सुरुवात होताच जळगाव जिल्ह्यातील उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून आगामी चार दिवस तापमानात वाढ होणार असून या काळात उष्ण लाटेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सामान्यतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात हवेतील आर्द्रता ४० ते ४५ टक्क्यांच्या आसपास असते. मात्र यंदा आर्द्रतेत मोठी घट दिसून येत असून ती थेट १८ ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे वातावरण अधिक कोरडे होत असून उकाड्याची तीव्रता वाढली आहे.

हवामानातील या बदलामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगतात. उत्तरेकडील भागात पश्चिमी विक्षोभ नसल्यामुळे थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचबरोबर गुजरात आणि राजस्थानकडून येणारे अत्यंत उष्ण व कोरडे वारे राज्यात प्रवेश करत आहेत. या दोन्ही कारणांमुळे हवेतील आर्द्रता घटली असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे.

दरम्यान, सोमवारपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात कमाल तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान १९ ते २१ अंशांच्या दरम्यान राहील. हवा कोरडी राहणार असल्याने उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.