उकाडा वाढणार ! हवामान विभागाकडून तापमान वाढीचा इशारा
मुंबई/जळगाव । जळगावसह राज्यभरात हवामानाचे चित्र झपाट्याने बदलताना दिसत असून काही भागांत अजूनही थंडीची चाहूल आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, दुपारच्या वेळी वाढत्या उकाड्यामुळे उन्हाळा जवळ आल्याची जाणीव होत असून हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच वातावरणात मोठे चढउतार दिसून येत आहेत. उत्तरेकडील प्रदेशात अजूनही गारवा कायम असला तरी इतर भागांमध्ये सकाळी थंडी आणि दुपारी उष्णता अशी विसंगत परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. किमान तापमानात सातत्याने बदल होत असून दुपारी वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. हवामानातील या बदलांचा परिणाम थेट आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला आणि इतर तक्रारी वाढताना दिसत आहेत.


भारतीय हवामान विभागयांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किमान तसेच कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केरळमधील कोची येथे देशातील सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात अमरावती येथे 36 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून उकाडा वाढला आहे. काल मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान १८ अंश नोंदवले गेले. दरम्यान, कमाल आणि किमान तापमानात १६ अंशांची मोठी तफावत निर्माण झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांत किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रात्रीचा गारवा कमी होईल. १८ ते २१ फेब्रुवारी या काळात हवामान मुख्यतः स्वच्छ राहील, पण काही दिवस हलके ढग दिसतील. कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांपर्यंत जाईल.