मुंबई : मागच्या काही दिवसापूर्वी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नेता सूरज चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, आणि ते काही काळ फरारही होते.याच घटनेनंतर अजित पवार यांनी कठोर भूमिका घेत सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
मात्र आता अवघ्या काही दिवसांतच सूरज चव्हाण यांना पुन्हा स्वीकारले असून, त्यांची थेट प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवर सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीची घोषणा करणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सूरज चव्हाण यांचे पक्षाच्या वाढीसाठी आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
“महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. चव्हाण यांना शुभेच्छा,” असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पक्षाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.