बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेस माघारीच्या तयारीत, सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा?
बारामती । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारr, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसकडे निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन करून माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे नेते ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सक्रिय झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Vijay Wadettiwar यांनी याबाबत सूतोवाच करत, स्थानिक परिस्थिती आणि सर्वांच्या भावना लक्षात घेता निवडणुकीतून पुढे न जाण्याची भूमिका दिसत असल्याचे सांगितले.


दरम्यान, या निर्णयापूर्वी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत संवाद साधला असून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. तसेच नेते रमेश चेन्निथला यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, विजय वडेट्टीवार यांनी माघारीची घोषणा केली असली तरी काँग्रेसचा अधिकृत अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीबाबत राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काही तासांत अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.