मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई । अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवारयांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.


त्यानुसार, शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.