जळगाव महापालिकेत १६ स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर
जळगाव । जळगाव महानगरपालिकेत प्रतिष्ठित स्थायी समिती सदस्य निवडीचा कार्यक्रम पार पडला. महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत बंद लिफाफ्यातून १६ स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर सभापती निवडीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या आर्थिक निर्णयांची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीवर भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. १६ सदस्यांपैकी भाजपच्या १० नगरसेवकांना स्थान मिळाले. यामध्ये नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, विशाल भोळे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे आणि नितीन सपके यांचा समावेश आहे.


राजकीय फेरबदलानंतर शिवसेना शिंदे गटाने ५ सदस्यांची निवड करून समितीत आपले स्थान मजबूत केले आहे. यामध्ये विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, विक्रम सोनवणे, सागर सोनवणे आणि नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले, ज्यासाठी इब्राहिम पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
सभापती निवडीसाठी मार्ग मोकळा
स्थायी समिती सदस्य जाहीर झाल्यानंतर सभापती निवडीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. या निवडीमुळे महानगरपालिकेतील रखडलेले आर्थिक निर्णय, निविदा प्रक्रिया आणि विकासकामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महापौरांनी नावे जाहीर करताच नव्याने निवडलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले, आणि पुढील कामासाठी समिती सज्ज झाली आहे.