ST कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी सरनाईक आक्रमक
मुंबई । राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचं ५६ टक्केच वेतन जमा करण्यात आलं आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून अशातच उर्वरित पगार मंगलवारपर्यंत होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच सरनाईक यांनी परिवहन खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची तक्रार करीत अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत रोष व्यक्त करीत महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा. अर्थ खात्याकडे आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबईमध्ये बोलत होते. महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीतर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम सरकारकडून आमच्या खात्याला लवकरत मिळत नाही, असे सरनाईक म्हणाले.
येत्या 5 वर्षात 25 हजार बसेस घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. किती एसी बस आणि किती नॉन एसी बस लागतात याचा आढावा घेणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. एसटी डेपोतील पेट्रोलपंप आम्ही चांगल्या कंपनींना देणार आहोत. त्यासाठी रिलायन्स, इंडियन ऑईल या कंपन्यांचा प्रस्ताव आले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.