जळगाव जिल्ह्यात उभारले जाणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला लोकसंवाद व सहकार्यातून गती द्या– महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र

जळगाव, – शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून जळगाव जिल्ह्यात 850 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, 153 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यापैकी 68 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेला लोकसंवाद व सहकार्यातून गती देण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत श्री. लोकेश चंद्र बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, सौर सल्लागार श्रीकांत जलतारे, मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी (जळगाव) आदी उपस्थित होते.

श्री. चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सौर कृषी वाहिनी योजना-2.0 इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील वर्षभरात 16,000 मेगावॅट वीज दिवसा शेतीसाठी पुरविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या योजनेचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याला भेट देत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 153 उपकेंद्रांच्या ठिकाणी 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून, 14 उपकेंद्रांमध्ये 68 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, गैरसमज दूर करावेत आणि टास्क फोर्सने लोकसंवाद, सहकार्य व प्रबोधनातून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे व पायाभूत सुविधा विकसित करणे यावर भर देण्याचेही त्यांनी सुचविले.

ग्रामसभेत सौर योजनांचा प्रसार करा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि मागणीवर आधारित सौर कृषिपंप यासारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक संवाद व प्रबोधन महत्त्वाचे असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने या योजनांना गती द्यावी. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनांची माहिती देऊन गावागावांत जागृती करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. चंद्र यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.