मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये बॉम्ब, त्या मेसेजनंतर एकच खळबळ; भूसावळ स्थानकावर गाडीची तपासणी
भुसावळ । राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाने देशात अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी केला असून पोलिसांकडूनही महत्त्वाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा तैनात केली जातेय. याच दरम्यान मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संदेशामुळे प्रवाशांमध्येच एकच खळबळ उडाली. एक्सप्रेसची तपासणी जळगाव आणि भूसावळ स्थानकावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्सप्रेसच्या एका कोचमधील शौचालयात “पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, गाडीत बॉम्ब आहे” असा संदेश लिहिलेला आढळला. हा संदेश पाहताच प्रवाशांनी तत्काळ रेल्वे सुरक्षा बलाला (RPF) कळवले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी येताच तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली.


संपूर्ण गाडीची तपासणी श्वानपथकाच्या मदतीने करण्यात आली. प्रत्येक डब्याची कसून तपासणी करून प्रवासी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नसल्याचे रेल्वे सुरक्षा बलाने स्पष्ट केले आहे. सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर महानगरी एक्सप्रेसला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा संदेश आढळल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.