श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राटांना मानवंदना
बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा
मुंबई | बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार सादरीकरणाने अतीशय कमाल केली. रंगमंचावरील कुणी प्रज्ञा चक्षु तर कुणाचे हात, कुणाचे पाय नाहीत परंतु केवळ जगण्याची जिद्द नाही तर सूर, स्वर, संगीत, वाद्य अशा कशातही आम्ही कमी नाही किंबहुना धडधाकट कलाकारांपेक्षा आम्ही काकणभर सरस ठरु, अशा प्रकारे सभागृहात आपापल्या अदाकारीने दाखवून दिले.


एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होत असतांना बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे बंधूराज ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि केवळ श्रीकांतजींसाठीच मराठी गाणी गाणाऱ्या महंमद रफी यांच्या आवाजाची जादू दिव्यांग गायकांनी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आणि एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंखचा अनोखा नजराणा पेश केला. बिपिन वर्तक, मकरंद भोसले, विनोद गावंडे, सुधीर पालांडे, सारिका शिंदे, श्रद्धा घुगे या गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट गीतांचा नजराणा पेश केला.
नृत्यांगना ज्योती मस्तेकर यांनी ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा लावण्यांच्या नृत्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. संतोष मोहिते, नागेश कांबळे, दीपक कांबळे, हर्षवर्धन वर्तक, डोनाल्ड कोळी, महेश नाईक, शिवाजी बनसोडे या वादक कलाकारांनी स्वरपंखच्या कार्यक्रमास उत्साहाचे, भरारीचे पंख लावल्याने कार्यक्रमाची नजाकत वाखाणण्याजोगी होती. स्वतः प्रज्ञा चक्षु असलेल्या बिपीन वर्तक यांनी केलेले सूत्रसंचालन व्यावसायिक मराठी वाद्यवृंदातील प्रख्यात निवेदकांची आठवण करून देत होती.
स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग कलाकारांच्या अनोख्या वाद्यवृंदाची संकल्पना आणि निर्मिती कनक क्रिएशनचे अतुल साटम यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरीवली नाट्य परिषदेचे झुंजार पदाधिकारी विजय तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाजनको, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, घारे ज्वेलर्स, गिरगांव कट्टा, लायन्स क्लब ऑफ मुंबई प्लॅटिनम, फार्मा प्रोफेशनल संदीप मानकामे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने सदैव पाठीशी उभे राहणारे गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालंडकर, आयोजक संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.