स्वबळावर लढायची आमचीही तयारी.. शिंदे सेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
एकीकडे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढविण्याचे बोलले जात असून यातच आता आगामी निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याची चाचपणी सुरू केली असल्याचं समजतंय. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आहे. आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार आहोत, असं शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट म्हणाले, काही नेते उगाच आपलं मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं आहे, ते आपल्या नेत्यांना सांगा. आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर, आम्हाला मान्य असेल, असं शिरसाट म्हणाले.
आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार
आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नका. महायुतीसोबत लढायचं तर, हो म्हणा, नसेल तर आम्ही स्वत: स्वबळावर लढायला तयार आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार हे लवकरच स्पष्ट होईल.