शनी शिंगणापूर देवस्थानात जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई; प्रशासकीय कार्यालयाला सील
अहिल्यानगर: देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालयाल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले. यानंतर मंदिर परिसर आणि विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे.
शनिशिंगणापुर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचे अनेक प्रकार समोर आल्याने तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली होती.


जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ हे कार्यालय सील केले आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिर देवस्थान ट्रस्टसंदर्भातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची कारवाई केली.शनि शिंगणापूर देवस्थान कार्यालय सील करताना येथील कार्यकारी अधिकारी मात्र गैरहजर असल्याचे पाहायला मिळालं.
पोलीस बंदोबस्त आणि सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय कार्यालय सील करण्यात आले आहे. त्यामुळे, आता येथील मंदिर समितीचा संपूर्ण कारभार शासनाकडे असणार आहे.