मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी सौ. शैलजा विजय शिंदे यांचे निधन ; ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई, : मंत्रालयात गृह, कृषी आणि सामान्य प्रशासन विभागांत कार्यरत राहून प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या अधिकारी सौ. शैलजा विजय शिंदे यांचे आज पहाटे चारकोप कांदिवली येथे दीर्घकालीन आजाराने दुःखद निधन झाले. सहकार आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विजय भास्कर शिंदे यांच्या त्या पत्नी होत.
कन्या अंकिता हिने अहोरात्र सेवा शुश्रुषा केली. कोकणातील ज्येष्ठ पत्रकार श्री. राजन चव्हाण यांचे सुपूत्र तेजस चव्हाण यांच्या समवेत विजय आणि शैलजा शिंदे यांची एकमेव कन्या अंकिता हिचा विवाह धूमधडाक्यात पार पडला पण नियतीला हे सुख पाहवले नाही. तेजस चव्हाण यांचे अकाली देहावसान झाले. तेंव्हापासून अंकिताच्या मातोश्री सौ. शैलजा कन्येवरील आघात सहन करु शकल्या नाहीत आणि त्या शारीरिक दृष्ट्या खंगत गेल्या.
मधुमेहामुळे आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करावे लागत होते. दुसऱ्या बाजूला विजय शिंदे दोन वर्षांपासून अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने बिछान्यावर पडून होते. फिजिओथेरपी सुरु करण्यात आली. प्रकृती सुधारत असतांनाच सौ. शैलजा यांना काल डायलिसिस नंतर ह्रुदयविकाराचा जोरदार झटका आला आणि व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. अखेर आज पहाटे त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विजय शिंदे यांनी परळ लालबाग येथील सुपारीबाग सुपरमार्केट संस्थेचे अध्यक्ष पद तसेच अपना सहकारी बॅंकेचे संचालक पद भूषविले असल्याने सहकारी, समाजवादी चळवळीतील अनेक कार्यकर्ते, सौ. शिंदे यांच्या मंत्रालयातील सहकारी तसेच चारकोप कांदिवली येथील सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज दुपारी साश्रुनयनांनी दिवंगत सौ. शैलजा शिंदे यांना अखेरचा निरोप दिला.