काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे निधन; नंदुरबारच्याराजकीय वर्तुळात शोककळा
नंदुरबारच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सुरुपसिंग नाईक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या या निधनाच्या बातमीने काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक हे 1981 ते 2019 राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. इंदिरा गांधी आणि गांधी परिवाराचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून विश्वासू सहकारी म्हणून नाईक यांची ओळख होती. सुरुपसिंग नाईक यांच्यासाठी इंदिरा गांधी यांनी खांडबाऱ्यात सभा घेतली होती.


आणीबाणी नंतर सुरुपसिंग नाईक यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळगळात पोहचवत पक्षाला मजबूत केलं होतं इतकेच नाही, तर त्यांनी आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. राज्यात समाजकार्य करता यावे यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत राज्यातील राजकारणात सक्रीय झाले होते.
सुरुपसिंग नाईक यांचे राजकीय कार्य
नवापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारलं. आदिवासी युवकांना शिक्षणाचा प्रवाहात आणलं
आदिवासीबहुल भागात एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध
कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
19 72 ते 1981 मध्ये त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदारकी निभावली होती.
1981 ला खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता.
1981 मध्ये त्यांनी आदिवासी विकास समाज कल्याण मंत्रीपद भुषवले होते.
1981 ते 82 मध्ये त्यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची सदस्यता निभावली होती.
1982 नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांची बिनविरोध विधानसभेवर निवड झाली होती.
1982 ते 2009 सलग महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
1982 पासून 2009 पर्यंत आदिवासी विकास विभाग वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन परिवहन विभागाचे मंत्रीपदही त्यांनी भूषविले होते.
2009च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
2014 विधानसभा निवडणुकीत पुन्हा नवापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी
2019 निवडणुकीत राजकारणातून बाजूला होत मुलगा शिरीष कुमार नाईक यांना नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार केलं होतं.