मा.ध.पालेशा वाणिज्य आणि कला व विज्ञान महाविद्यालय, ‘स्कूल कनेक्ट 2.0
अभियानांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यशाळा’ संपन्न
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मा.ध. पालेशा वाणिज्य आणि कला व विज्ञान महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्कूल कनेक्ट 2.0 अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शैक्षणिक धोरणाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांच्या प्रास्ताविकाने झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजी पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य) होते.
यांचे विचार
कार्यशाळेत बोलताना अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या महत्वावर चर्चा केली. ते म्हणाले, “हे धोरण शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले आहे. बहुविध कौशल्य विकास, मातृभाषेत शिक्षणाचा समावेश आणि विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्याची संधी देणे या धोरणाचे मुख्य उद्देश आहेत. नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि संशोधनाची भावना निर्माण होईल.”
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजी पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात NEP 2020 च्या तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणातील योगदानावर भर दिला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना उद्योगजगताची गरज ओळखून शिक्षण देणे हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, नवीन मूल्यांकन पद्धती, आणि डिजिटल शिक्षणाचा समावेश हे या धोरणाचे महत्त्वाचे भाग आहेत. हे धोरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप उपयुक्त ठरेल.”
या कार्यशाळेत धुळे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. डी. एम. बारी कनिष्ठ महाविद्यालय, कमलाबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि जो. आर. सिटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.
कार्यक्रमात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची एक विशेष व्हिडिओ क्लिप विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. यामध्ये विद्यापीठाच्या कार्यपद्धती, शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुषमा सबनीस यांनी केले, तर प्रा. पल्लवी वाळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एम. एम. मून यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षणाच्या नव्या संधी, तंत्रज्ञानाचा समावेश आणि कौशल्य विकास या विषयांवर माहिती देण्यात आली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.