नवी दिल्ली । जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. मलिक हे 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते.
सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थी राजकारणातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक टप्पे होते, ज्यामध्ये ते विविध राजकीय पक्षांशी जोडले गेले. सुरुवातीला ते विद्यार्थी नेते होते आणि नंतर लोकदल, जनता दल, आणि काँग्रेस अशा पक्षांमध्ये त्यांनी काम केले. 1989 मध्ये ते अलीगढ लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच ते राज्यसभेचे सदस्यही होते.
जम्मू-काश्मीर, गोवा, मेघालयचे राज्यपाल
2017 मध्ये ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि त्यांची राजकीय कारकिर्द अधिक उजळली. त्यानंतर त्यांनी बिहार, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांची जम्मू-काश्मीरमधील कारकिर्द विशेषतः ऐतिहासिक ठरली. ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते आणि त्यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.