मुंबई : साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद आता विधीमंडळात उमटले असून महायुतीतच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, या घटनेत दुखापत झाल्याची तक्रार मंत्री शंभुराज देसाई यांनी केल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले. या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.


या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची तातडीची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
सातारा राडा प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही, तर आम्ही सर्व मंत्री आणि आमदार राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी दिला. महायुतीत वारंवार शिंदेसेनेला दुय्यम वागणूक मिळत आहे. रायगड आणि साताऱ्याची उदाहरणे देण्यात आली. आता भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये. यावर ठोस भूमिका मांडली पाहिजे . या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली.