संदीप राक्षे यांना “भारत गौरव सन्मान” पुरस्कार
शांताई फाऊंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था व विसावा वृद्धाश्रम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन, पुणे येथे मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते तेजस बर्वे यांच्या शुभहस्ते भोसरी येथील सामाजिक, साहित्यिक, वृक्षसंवर्धन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गुड मॉर्निंग या मराठी चित्रपटाचे निर्माते, प्रवासवर्णनकार संदीप राक्षे याना “भारत गौरव सन्मान २०२५” हा पुरस्कार मिळाला. यावेळी अभिनेते दिग्दर्शक प्रकाश धिंडले, अभिनेते दिलीप घेवंदे, युवा उद्योजक अभिजित करपे हे उपस्थित होते. वारसा शिल्पकलेचा, हेमलकसा एक रोमहर्षक सफर, लेण्यांचा महाराष्ट्र, भटकंती धरतीच्या स्वर्गाची या पुस्तकांचे लेखक, यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेचे संचालक संदीप राक्षे हे आहेत.
संदीप राक्षे यांनी पुरस्कार स्वीकारताना आपली भावना खालील संतशैलीतील ओवीद्वारे व्यक्त केली.
“बोधचंद्राचिया कळा!
विखुरल्या एकवळा!!
कृपापुनीव लीळा!
करी जयाची!!”
त्यांनी पुढे सांगितले “साधनेचा चंद्र जसजसा कलेकलेने वाढतो, तसा प्रत्येक साधक सद्गुरूकृपेने अंतर्बोधाच्या प्रकाशाने उजळत जातो. आणि जेव्हा कृपेचा एक थेंब अंतःकरणावर पडतो, तेव्हा ‘मी’ नाहीसा होतो आणि ‘ज्ञानेश्वर’ प्रकट होतो. माझ्यासाठी हा सन्मान केवळ पुरस्कार नाही, तर संत ज्ञानोबारायांच्या कृपाभावनेचा साक्षात्कार आहे.