जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

0

ज्यांच्याशी आपला वैरभाव आहे अशांची क्षमा याचना करण्याचे आवाहन

जळगाव : येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे सामूहिक क्षमापना दिन श्रद्धा भाव आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयम स्वर्ण साधिका श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी डॉ. सुप्रभाजी म.सा. आधी ठाणा सहा यांच्या पावन सान्निध्यात आत्मोत्कर्ष चातुर्मास 2025 सुरू आहे. त्या अंतर्गत पर्वाधिराज पर्युषण पर्वाच्या समाप्ती पश्चात 28 ऑगस्ट रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्षमापना प्रसंगी समाजबांधवांनी एकमेकांची माफी मागून परस्पर सौहार्द आणि आत्मशुद्धीचा संदेश अनुभवला.

या कार्यक्रमाआधी ‘क्षमा’ हा छोटा शब्द मनातील कटुता, द्वेष दूर करून शांती आणतो. हा शब्द म्हणजे दयाळूपणा, सहानुभूती आणि नातेसंबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे काम करतो. क्षमा करणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना मुक्त करणे. ती अंतःकरण शुद्ध करते, तणाव कमी करते आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देते. खरे तर ज्यांच्याशी आपला वैरभाव आहे अशांची क्षमा याचना केलीच पाहिजे असा मौलीक संदेश प.पू. डॉ. उदितप्रभाजी, प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी विशेष धर्म संदेशात दिला. यावेळी व्यासपीठावर संयम स्वर्ण साधिका, श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा., प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा, प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा., आणि नीलेशप्रभाजी म.सा. आदिठाणा सहा यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मोत्कर्ष चातुर्मास समिती प्रमुख श्रीमती ताराबाई मदनलालजी डाकलिया यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विजयराज कोटेचा, कस्तुरचंदजी बाफना, संघपती सेवादास दलिचंद जैन आणि मा.खा. ईश्वरलालजी जैन यांनीही सर्वांची क्षमा याचना करत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विशेष आकर्षण ठरले ते सात दिवसांचा उपवास पूर्ण करणाऱ्या केवळ सात वर्षीय संस्कारकुमार दीपक सिसोदिया याचा सन्मान. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आर.सी. बाफना समूहाचे सुशील बाफना आणि आर.एल. ज्वेलर्सचे मनीष जैन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या लहानग्याच्या मनोबलाचे आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. कार्यक्रमाला जैन समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामूहिक क्षमापना उपक्रमाने जैन समाजात संयम, क्षमा आणि आध्यात्मिक शुद्धतेच्या मूल्यांचा संदेश अधिक बळकट झाल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.