इगतपुरीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचा जागर : रुकम्मा जयंती उत्साहात साजरी

0

इगतपुरी : 
पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ, अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय आणि रुकमाबाई अपंग युवक स्वयम सहायता केंद्र इगतपुरी यांच्या वतीने पुज्य रुकम्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात कर्णबधिर, गतिमंद तसेच अंध अपंग विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे शारीरिक अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गीते सादर केलीच, पण त्या गाण्यांना स्वतः संगीतही दिले. संगीताची लय, सूर आणि भाव यांचा सुरेख संगम अनुभवताना उपस्थित प्रेक्षक थक्क झाले.
कार्यक्रमादरम्यान समाज प्रबोधन करणाऱ्या विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. सामाजिक जाणीव, एकोप्याचा संदेश, स्वच्छता, शिक्षणाचे महत्त्व अशा विषयांवर आधारित सादरीकरणातून त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश दिला. केवळ नृत्यच नव्हे तर अभिनयातूनही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर अनेकांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक करत “तोंडात बोट” घालण्याची वेळ आली.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध हस्तकला वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेबरोबरच स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी या वस्तूंना भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष शालिनी खातळे, नगरसेविका वंदना रोकडे, आशा थोरात, आशा भडांगे , चारुलता ठाकूर,संस्थेचे केदार भट , विवेक हट्टंगडी,राजेंद्र शिंदे, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.