जळगावसाठी एकतरी उद्योग आणला का? रोहित पवारांचा गिरीश महाजन यांना सवाल
जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या गोंधळावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. यावर गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना भुसावळमधील सभेत प्रत्युत्तर दिले. “भाजपचा एक साधा कार्यकर्ता इथपर्यंत सहजपणे पोहोचलेला नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून जनतेची कामे करत आहोत. जनतेने उगाच नाही आम्हा पती-पत्नीला सात ते आठ वेळा निवडून दिले. लोजामनेरमध्ये माझ्या समाजाची मते फक्त 3 हजार आहेत. इतर समाजाचे लोक आम्हाला कामांच्या जोरावर निवडून देतात. तुमच्यासारखे आजोबांच्या आणि काकांच्या पुण्याईने आम्ही राजकारणात आलो नाही,” असा टोला महाजन यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.
जळगावमध्ये एकतरी उद्योग आणला का?


गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का?
आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या, असे ते म्हणाले.
कर्जत – जामखेडचे राजकीय वजन वाढले
बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019 मधे 40 हजारांनी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही VoteChori केली. असो, तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येतं.
बाकी, धार्मिक भावनांच्या नावाखाली आपण करत असलेलं पैसा आणि सत्तेचं राजकारण आणि नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याचा आम्ही योग्य वेळी भांडाफोड करूच, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.