रोहन घुगेंनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार
जळगाव । जळगाव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारीपदी रोहन बापूराव घुगे यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहेत. घुगे यांची जिल्हाधिकारीपदाची जळगावातली ही पहिलीच पोस्टींग आहे.
आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यामुळे, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे यांची नियुक्ती झाली आहे.


आज जळगावच्या जिल्हाधिकारीपदा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली.
जिल्हाधिकारी घुगे यांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली की, ‘कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामात दिरंगाई किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.’ तसेच, त्यांनी विविध विभागांमध्ये रखडलेल्या विकासकामांना तातडीने गती देण्याबाबतच्या सूचनाही यावेळी दिल्या. जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला गतिमान आणि पारदर्शक बनवण्यावर आपला भर राहील, असे संकेत त्यांनी पहिल्याच दिवशी दिले आहेत.