प्रतिक्षा संपली ! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; कधी आणि कुठे पाहता येणार ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अर्थात मंगळवारी (13 मे 2025) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर आता विद्यार्थांची प्रतिक्षा संपली आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.
येथे पाहू शकता निकाल –
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
गेल्या वर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत होती. तर उर्वरित राज्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.