नगर परिषद निवडणुकीत रक्षा खडसेंपासून ते मंत्री गुलाबराव पाटलांना धक्का

0

जळगाव । जळगावसह राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समोर येत असून यात महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून त्या तुलनेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. मात्र या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंपासून ते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव हा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच त्यांना धक्का बसला आहे. महाविकास आघाडी प्रणित धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. लिलाबाई चौधरी यांना 2417 मते मिळाली. या निवडणुकीत चौधरी यांनी महायुती प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या वैशाली भावे यांचा पराभव केला आहे. हा पराभव गुलाबराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रक्षा खडसेंची जादू नाहीच

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना होम पिचवर मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा विजय झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा 2561 मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत रक्षा खडसे या भाजपचं नेतृत्व करत होत्या. त्यांना मतदारांनी नाकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील या नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या आहेत. येथे भाजपने माजी आमदार दिलीप वाघ यांची पत्नी सुचेता वाघ यांचा पराभव झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.