महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार; आज या जिल्ह्याना अलर्ट
मुंबई । गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मागच्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान राज्यात मान्सूनचा जोर आणखी वाढणार असून आज राज्यातील अनेक ठिकाणी हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना आणि मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या रहिवाशांनीही सतर्क रहावे.
हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत आहे. यासोबतच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, पाकिस्तान ते बांगलादेश दरम्यान पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे.
ऑरेंज अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.
येलो अलर्ट :
पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
येलो अलर्ट :
बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर.