आज राज्यात धो-धो पावसाचा अंदाज ; जळगावलाही महत्वाचा अलर्ट
जळगाव । राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा असणार आहे. कारण आज राज्यात धोधो पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने आज पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


याचबरोबर कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला असून रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार, पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार असून, विशेषत: कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका अधिक राहील. दरम्यान, नागरिकांनी नदीकाठी, धरण परिसरात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.