नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे आयएमडीने सांगितलेय. दरम्यान, पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. २५ आणि २६ जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासासाठी सात जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट), सातारा (घाट), कोल्हापूर (घाट) आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील ४८ तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून मच्छीमाराला समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीला ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय. पुढील सूचना मिळेपर्यंत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
दोन दिवसांपूर्वी विदर्भात पावसाने हाहाकार घातला आहे. भंडारा आणि चंद्रपूरमध्ये मागील ४८ तासांपासून जोरदार पाऊस पडत आहेत. त्यातच आता आजही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, चंद्रपूर आणि भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना आज सुट्टी देण्यात आली आहे.