जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट ; शेतकऱ्यांची चिंता वाढली
जळगाव । जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढलं आहे. मागच्या तीन चार दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ऐन उन्हाळ्यात पाऊस बरसत असल्याने जळगावकरांना सध्या दुहेरी वातावरणाचा अनुभव येत आहे.
दरम्यान, हवामान खात्यानं जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला असून त्यात आज ३ आणि ४ एप्रिल रोजीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने उष्णतेचा प्रभाव कमी झाला आहे. या बदलत्या हवामानामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घसरण झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीत दिसून आले आहे.
बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. सामान्यतः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान झपाट्याने वाढत असते, मात्र अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना उकाड्यातून तात्पुरता दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजनुसार, जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात आज ३ आणि ४ एप्रिल रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यादरम्यान आज आणि उद्या जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी लावण्याची शक्यता असून काही भागांत गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.