महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल; या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता

0

मुंबई/जळगाव । एकीकडे फेब्रवारी महिना संपत आला असून उन्हाचा चटका चांगलाच वाढल्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहे. मात्र अशातच आता अवकाळीचाही फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल झाले असून राज्यात अनेक जिल्हांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात तापमान वाढल्याने उकाड्याने जळगावकर हैराण झाले.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान जोरदार वारेही सुटेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले.

नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 11.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

जळगावातील तापमान?
दरम्यान, जळगाव शहरातील तापमानात आता हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. रविवार, २२ फेब्रुवारी रोजी शहराचा पारा ३५.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल. मात्र, मार्च महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ७ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.