महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज ; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

0

पुणे : राज्यात पाठ फिरविलेला मान्सून पाऊस पुन्हा परतला असून हवामान खात्यानं पुढचे काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान आज (24 जुलै) कोकण आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

‘विफा’ चक्रीवादळाचे अवशेष आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा पावसाला पोषक ठरत आहे.

कोकण, घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही अति मुसळधार पावसाचा इशारा आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
ऑरेंज अलर्ट (जोरदार पाऊस) : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा.
-यलो अलर्ट (मध्यम ते जोरदार पाऊस) : कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
-विजांसह पाऊस (यलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

नागरिकांना सावधानतेचे आवाहन

हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: रेड अलर्ट असलेल्या भागात पूर आणि भूस्खलनाचा धोका असू शकतो. मुंबई आणि ठाण्यातही जोरदार पावसामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.