आज जळगावसह १३ जिल्ह्यामध्ये पावसाचा अलर्ट जारी
जळगाव । मान्सूनने काही भाग वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून माघार घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. पण काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान पाहायला मिळत आहे. हवामान खात्यानं आज दि १६ ऑक्टोबर रोजी जळगावसह राज्यातील १३ जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत राज्यात उन्हाचे चटके जास्त जाणवतील.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पहाटे गारवा आणि नंतर उन्हाचा चटका असे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यामध्ये सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशत: ढगाळ वातावरण, उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवत आहे. काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झाले आहे. दरम्यान पुढील चार दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांचा समावेश आहे