जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी
जळगाव । सध्या राज्यावर अवकाळीचे संकट ओढावले असून हवामान विभागाने अवकाळी पावसाबाबत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे
जळगावात गेल्या आठवडाभरापासून वाढत जात असलेल्या तापमानात सोमवारी काही प्रमाणात घट झाली असून, रविवारी ४० अंशावर असलेला पारा सोमवारी ३८ अंशावर आला होता. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, मंगळवारी व बुधवारी जिल्ह्यात वादळासह गारपिटीसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन दिवस पावसाचे, पाच दिवस ढगाळ वातावरणाचे
जळगाव जिल्ह्यात १ व २ एप्रिल रोजी पावसाचा जोर राहू शकतो. मात्र, त्यानंतर पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, राज्यातील इतर भागांमध्ये ७ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात केवळ २ दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी ७एप्रिलपर्यंत जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.